Wednesday, January 22, 2025
HomeपरभणीLadki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी?...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी? अनेकांना फोन, जीएसटी भरण्याचं आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी ठाराविक गॅस सिलिंडर मोफत दिले जातात, परंतु आता याच लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाणी गिरणी मिळणार आहे, असे फोन येण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही भागातील लाभार्थ्यांना जीएसटी भरण्यास सांगितलं जात आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफिसला शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी आली आहे, ते पोहोच करण्यासाठी जीएसटी, ट्रान्सपोर्ट खर्च चालकाच्या फोन पे नंबरला ऑनलाईन पाठवा, असे फोन कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला-पुरुषांच्या मोबाईलवर येत आहेत.

मोबाईलवर काय सांगितलं जातंय?

मागच्या दोन दिवसांपासून पैठण तालुक्यातील लोहगाव मावसगव्हान, ढाकेफळ आदी गावातील काही भोळ्या-भाबड्या लाडक्या बहीण व त्यांच्या पतींना मोबाईलवर असे फसवे फोन येत आहेत. मी समाज कल्याणमधून शिसोदे बोलतो, आपल्या भागातील,तालुक्यातील प्रतिष्ठीत राजकारणी नेते माझे नातेवाईक आहेत. मी छत्रपती संभाजीनगर लाडकी बहिण योजनेचा अध्यक्ष आहे. मोजक्याच महिलांना समाज कल्याण विभागाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशीन आलेले आहेत. ते पाठवण्यासाठी जय अंबे ट्रान्स्पोर्ट वाळुंज गोडावून यांच्याकडे दिलेले आहे. त्या ट्रान्स्पोर्ट चालकांचा मोबाईल नंबरवर तुमचं गाव,गल्ली,सांगा वस्तू पोहोच करण्यासाठी लगेच बोला..त्यासाठीच्या जीएसटी आदी खर्चापोटी दोन हजार ते सोळाशे रूपये त्याला ऑनलाईन पाठवा. पैसे टाकले की स्क्रीन शॉर्ट फाईलला जोडण्यासाठी टाका.. असे कॉल अप्पासाहेब डांगे, कृष्णा काळे, संतोष शिंदे, मनोज जाधव, अनिल तेजिनकर, संजय थोरात , दादासाहेब कडूबाळ गोरे आदींना आले आहेत.

सदरील प्रकार बनवाबनवीचा व आर्थिक लुटीचा असल्याचे अप्पासाहेब डांगे आणि इतरांच्या लक्षात येताच या प्रकाराची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी बीडकीनचे पोलिस निरीक्षक निलेश शेळके म्हणाले की, कोणत्याही योजनेच्या नावाखाली फोनवर संभाषण करणारे बनावट कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. यात ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आले होते त्या नंबरचे लोकेशन घेतले असता तो नंबर बाहेरच्या राज्यातील आहे, असे निदर्शनास आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments